आगामी विश्‍वकरंडक स्पर्धा डोळ्यांसमोर ठेवा

कोहलीच्या संघाला गंभीरने दिला सल्ला

नवी दिल्ली – भारतीय संघाने इतिहासात रमण्यापेक्षा येत्या ऑक्‍टोबरमध्ये होत असलेला टी-20 विश्‍वकरंडक तसेच 2023 सालच्या मुख्य विश्‍वकरंडक स्पर्धेला डोळ्यांसमोर ठेवत संघबांधणी सुरू केली पाहिजे, असा परखड सल्ला माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला दिला आहे.

भारताने 2011 साली विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली. त्यानंतर भारतीय संघाने आयसीसीने आयोजित केलेल्या एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवलेले नाही. केवळ आम्ही विश्‍वकरंडक जिंकला अशा आठवणींमध्ये रमण्यापेक्षा आगामी पाच वर्षांचे नियोजन केले गेले पाहिजे. सध्या भारतीय संघात अनेक नवोदित खेळाडू सरस कामगिरी करत आहेत. त्यांच्याकडे गुणवत्ताही आहे. मात्र, त्यांच्याकडून लक्षवेधी कामगिरी करून घेण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्‍यकता आहे. येत्या काळात अशीच संघबांधणी कोहलीला करावी लागणार आहे, असेही गंभीर म्हणाला.

आजच्या तारखेला दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 2 एप्रिल 2011 साली भारतीय संघाने 1983 नंतर पुन्हा एकदा विश्‍वकरंडक स्पर्धा जिंकली होती. या विजेतेपदाला उजाळा देतानाच भारतीय संघाने पुढील विश्‍वकरंडक स्पर्धेबाबत गांभीर्याने संघबांधणी केली पाहिजे, असे गंभीरने सांगितले. जर भारतीय संघाला जागतिक क्रिकेटवर वर्चस्व निर्माण करायचे होते तर त्यांनी 2015 व 2019 सालच्या स्पर्धेबाबत गांभीर्य दाखवायला हवे होते.

अजूनही आपण पुढील पाच वर्षांचे नियोजन केले पाहिजे तरच भारतीय संघाचे जागतिक वर्चस्व सिद्ध होईल. ज्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाने पुढील दोन दशकांचा विचार करत 1990 साली संघबांधणी केली तेच भारतीय संघाच्या बाबतीत घडले तरच आपण सातत्याने विजयी मार्गावर वाटचाल करू, असेही तो म्हणाला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.