मोठी बातमी! लवकरच लाॅकडाऊनचा निर्णय? मुख्यमंत्र्यांचा विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद

मुंबई – राज्यातील वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चित्रपट आणि टीव्ही मालिका निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी शासन घेत असलेल्या निर्णयाला सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. निर्मात्यांनी देखील आपल्या विविध सूचना मांडून एकजुटीने शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे आश्वासन दिले आहे.

या बैठकीला डाॅ. अमोल कोल्हे, महेश भट, सुषमा शिरोमणी सुबोध भावे, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, टीपी अग्रवाल, संग्राम शिर्के, अभिषेक रेगे यांसह आदींचा सहभाग होता. तसेच आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देखमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डाॅ. प्रदीप व्यास, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लाॅकडाऊनसंदर्भात वृत्तपत्र संपादक, मालकांशीही चर्चा केली आहे. लाॅकडाऊन कुणालाही हवाहवासा वाटत नाही. मात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी ही लढाई तुम्ही आम्ही मिळून लढावी असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

राज्यातील करोनाची परिस्थिती पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा करत असल्याचे दिसते आहे. हे पाहता कोणत्याही क्षणी सरकारकडून लाॅकडाऊनचा निर्णय होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

एक दिवसात 50 हजारांच्या जवळपास रुग्ण

काल (ता. 03) महाराष्ट्रात एकूण 49 हजार 447 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. तर 277 जणांचा मृत्यू झाला आहे. नवीन करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यात सध्या नाईट कर्फ्यूचे आदेश आहेत. मात्र ही वाढती संख्या पाहता लवकरच कडक लाॅकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.