मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षी शिवतीर्थावर होतो. पण यावर्षी शिवसेनेत दोन गट निर्माण झाले आहेत. दोन्ही गटाकडून त्याठिकाणी दसरा मेळावा घेण्याबाबत मुंबई महपालिकेत अर्ज करण्यात आले आहेत. त्यामुळे महापालिका आता कोणाला परवानगी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र आज शिवसेना भवन येथे झालेल्या बैठकीत माजी मुख्यमंत्री शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
दसरा मेळाव्याबाबत मनात कोणताही संभ्रम ठेवू नका, दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार आहे. मोठ्या प्रमाणात शिवतीर्थांवर गर्दी जमवा, असे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. शिवसेनेचा 21 तारखेला पदाधिकारी मेळावा होणार आहे. त्यासाठीही शाखा स्तरावर बैठका घेण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्याकडून महापालिकेकडे शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांनीही त्याचठिकाणी दसरा मेळाव्यासाठी अर्ज केला आहे. परवानगीसाठी दोन्ही गटाकडून दबाव वाढत चालला आहे. त्यामुळे परवानगी कोणाला द्यायची असा प्रश्न आता महापालिकेसमोर उभा राहिला आहे. परवानगी कोणाला मिळते हे पाहणे आता महत्वाचे आहे.