मागील वर्षभरात 60 हजार घरांमध्ये कनेक्शन
पुणे – महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीने (एमएनजीएल) मागील वर्षभरात शहरातील नव्या 60 हजार घरांमध्ये थेट पाइप लाइनद्वारे गॅस (पीएनजी) पुरवठा केला आहे. त्यामुळे शहरात पाइप लाइनद्वारे गॅस वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या दोन लाखांवर गेली आहे.
शहरातील घरांना स्वयंपाकासाठी आणि हॉटेल, उपहारगृहे, धर्मादाय संस्था आदींसारख्या यावसायिक आस्थापना तसेच उद्योगांना पीएनजीद्वारे गॅस पुरविण्यात येतो. यासाठी शहरात 220 किमी स्टील पाइपलाइन आणि 1200 किमी एमडीपीई (मीडियम डेन्सिटी पॉलिइथिलीन) पाइपलाइनच्या जाळ्यांचा समावेश आहे.
हडपसर, विमाननगर, कोथरुड, मॉडेल कॉलनी, एरंडवणे, बाणेर, पाषाण, सहकारनगर, कोंढवा, एनआयबीएम रस्ता, उंड्री, पिसोळी आदी भागांमध्ये “पीएनजी’ आधीच उपलब्ध झाला आहे. या टप्प्यानंतर महंमदवाडी, वानवडी, धायरी, स्वारगेट यासर इतर नवीन भागांमध्ये पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करून आणखी घरांना पीएनजी गॅस पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.