पुणे – एमएनजीएलने आपल्या ग्राहकांना मोबाईल अॅपद्वारे बिलाचे पैसे भरण्याची किंवा अपडेट करण्याची अशी कोणतीही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही. त्यामुळे अशा फेक अथवा फ्रॉड कॉल्सवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करीत एमएनजीएलचे बिलिंग विभागाचे प्रमुख आनंद जैन यांनी ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
एमएनजीएलकडे फेक कॉल्ससंदर्भात तक्रारी दाखल झाल्या आहेत. ग्राहकांना फोन करुन मोबाइल लिंक डाऊनलोड करुन पैसे भरा. अन्यथा तुमचे गॅस कनेक्शन बंद करण्यात येईल, असे सांगितले जात आहे. यातून एमएनजीलची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे एमएनजीएलच्या व्यवस्थापनाने ही बाब अतिशय गांभीर्याने दखल घेतली आहे. तसेच, एमएनजीएलनेही ग्राहकांना सूचित केले आहे.
त्यासोबतच, अशा फेक आणि फ्रॉड कॉल्स संदर्भात एमएनजीएलने १ एप्रिल २०२४ रोजी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार ही दाखल केली आहे. याशिवाय, एमएनजीएलने ऑफिशियल ट्विटर आणि फेसबुक पेजवरुनही ग्राहकांना सूचित केले आहे. तसेच, असे प्रकार कोणत्याही ग्राहकासोबत घडत असल्यास, त्यांनी ही बाब तातडीने पोलिसांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी.
एमएनजीएलच्या सर्व ग्राहकांनी तोतयागिरी करुन एमएनजीएलच्या नावाने फसवे कॉल्स करणाऱ्या आणि गॅस बिल भरण्यासाठी काही अॅप्स डाऊनलोड करण्यास किंवा लिंकद्वारे विचार करणाऱ्या फसव्या कॉल्सपासून सावध राहावे, असेही आनंद जैन यांनी सांगितले आहे.