नवी दिल्ली – केंद्र सरकारने चीनच्या आणखी 54 ऍप्सवर बंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. या सर्व ऍप्सपासून भारताच्या गोपनीयतेला आणि सुरक्षिततेला धोका असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यापैकी बरेच ऍप्स Tencent, Alibaba आणि गेमिंग फर्म NetEase सारख्या मोठ्या चिनी तंत्रज्ञान कंपन्यांचे आहेत. तसेच हे ऍप्स नामांतर किंवा दुसऱ्या ब्रॅंडच्या नावाखाली नव्याने लॉंच केलेले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे ऍप्स चीनसारख्या परदेशातील सर्व्हरवर भारतीयांचा गोपनीय आणि संवेदनशील डेटा ट्रान्सफर करत असल्याच्या कारणावरून इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने हे बंदी आदेश जारी केले आहेत. गुगलच्या प्ले स्टोअरसह टॉप ऍप स्टोअरनाही हे ऍप्लिकेशन ब्लॉक करण्याचे निर्देश दिले आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, भारतामध्ये प्ले स्टोअरवर 54 ऍप्स आधीच ब्लॉक करण्यात आले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी Meity ने माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 69 अ अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर केला आहे.
आतापर्यंत 224 चिनी ऍप्सवर बंदी
केंद्र सरकारने जून 2020पासून सुमारे 224 चिनी ऍप्सवर बंदी घातली आहे. पहिल्यांदा जेव्हा चिनी ऍप्सवर बंदी घातली तेव्हा 59 ऍप्सचा समावेश होता. ज्यात TikTok, Shareit, WeChat, Helo, Likee, UC News, Bigo Live, UC Browser, ES File Explorer आणि Mi Community सारख्या लोकप्रिय ऍप्लिकेशन्सचा समावेश आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये, स्नॅक व्हिडिओ, AliExpress आणि AliPay कॅशियरसह आणखी 43 चिनी ऍप्सवर बंदी घालण्यात आली होती. सप्टेंबरमध्ये सरकारने आणखी 118 ऍप्सवर बंदी घातली.