अखेर चीनचा ‘कुबेर’ जगासमोर ! म्हणाले,” कोरोना संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू”

बीजिंग : काही दिवसापूर्वी आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा बेपत्ता झाल्याच्या बातम्यांनी जगात एकच खळबळ उडाली होती.मात्र आता या सर्व बातम्यांना फाटा देत जॅक मा यांचा पहिला व्हिडीओ जगासमोर आला आहे. ‘अलिबाबा’ या ई कॉमर्स कंपनीचे संस्थापक असलेले जॅक मा यांचा हा व्हिडीओ चीनच्या सरकारी वर्तमानपत्राने जारी केला आहे.

‘जॅक मा’ हे ग्रामीण शिक्षणासंदर्भातील एका कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. ग्रामीण शिक्षक पुरस्कार सोहळ्याला जॅक मा यांनी उपस्थिती लावली. दरवर्षी हा कार्यक्रम होतो. जॅक मा फाऊंडेशनद्वारे 2015 पासून हा सोहळा आयोजित केला जातो. दरम्यान, नुकत्याच झालेल्या या सोहळ्यात जॅक मा यांनी देशभरातील 100 ग्रामीण शिक्षकांशी संवाद साधला. कोरोना संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटू असे अलिबाबांनी यावेळी शिक्षकांना सांगितले. अलिबाबा कंपनीचे मुख्यालय याच जेजियां प्रांतात आहे.

जगभरातील तरुणांचे आदर्श असलेले अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि चीनमधील सर्वात श्रीमंत उद्योगपती जॅक मा गेल्या दोन महिन्यांपासून गायब आहेत. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी पंगा घेतल्यापासूनच ते गायब झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

जॅक मा यांनी ऑक्टोबर महिन्यात शांघायमध्ये एक भाषण केले होते. त्यात त्यांनी जागतिक बँकिंग नियमांना ‘ज्येष्ठ नागरिकांचा क्लब’ म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच चीनच्या व्याजखोर वित्तीय नियम आणि सरकारी बँकांच्या कार्यप्रणालीवर सडकून टीका केली होती. शिवाय चिनी कम्युनिस्ट सरकारवरही त्यांनी कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे जिनपिंग सरकारविरोधात चिनी नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने जिनपिंग सरकार भडकले होते. या टीकेनंतर जॅक मा पुन्हा दिसलेच नाहीत. त्यामुळे जॅक मा गेले कुठे? असा सवाल केला जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.