प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 2 -शहरातील गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी महापालिकेकडून शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येत्या सोमवारी (दि.8) रोजी बोलवली आहे. यात प्रामुख्याने समन्वय आणि नियोजनात्मक चर्चा केली जाईल. दरम्यान, याबाबतची प्राथमिक बैठक दि. 12 जुलै रोजी झाली आहे.
वैभवशाली परंपरा असलेला गणेशोत्सव निर्विघ्न, सुरक्षित व्हावा या उद्देशाने महापालिका प्रशासन, पोलीस तसेच गणेश मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दरवर्षी महापौरांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली जाते. मात्र, यंदा आयुक्त विक्रम कुमार हे प्रशासक असल्याने त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यात गणेश मंडळांना दिला जाणारा मांडव परवाना, जाहिरात कमानी, पालिकेकडून या दहा दिवसांच्या उत्सवाच्या कालावधीत शहरात पुरवल्या जाणाऱ्या सुविधा याबाबत चर्चा केली जाते तसेच मंडळांच्या समस्या, त्यांचे प्रश्न जाऊन घेऊन त्यानुसार पोलीस आणि महापालिकेकडून संयुक्तपणे उपाययोजना केल्या जातात. त्यादृष्टीने यंदाही नियोजन केले जात आहे.
बैठकीचे कारण काय?
उत्सवासंदर्भात नियोजन करण्यासाठी दुसऱ्यांदा बैठक घेण्याची माणगी गणेश मंडळांनी केली होती.
कोठे होणार?
महापालिकेच्या जुन्या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात.
किती वाजता?
मनपा प्रशासक विक्रम कुमार यांच्या उपस्थितीत
दुपारी 3 वाजता.