सातारा – सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्यावतीने महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या विशेष उपस्थितीत बुधवारी (दि.2) सकाळी दहा वाजता गांधी अभिवादन सभा होणार आहे. या सभेला सर्व गांधी प्रेमी-कॉंग्रेसजनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
कॉंग्रेस भवनातून याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे, की दरवर्षी भवनात गांधी जयंती साजरी होत असतेच. परंतु यंदाचे गांधी जयंतीचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य लक्षात घेऊन भव्य कार्यक्रम आयोजित केला आहे. भवनाच्या प्रांगणात उभारलेल्या मंडपात ज्येष्ठ नेते आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली महात्मा गांधी आणि दिवंगत पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांना अभिवादन सभा होईल. याप्रसंगी गांधी-नेहरू चरित्र-विचारांचे अभ्यासक राज कुलकर्णी (उस्मानाबाद) यांचे ‘गांधी विचारांची आजच्या काळातील अपरिहार्यता’ या विषयावर व्याख्यान होईल. दरम्यान, या अभिवादन सभेला सर्व कॉंग्रेसजनांनी उपस्थित रहावे, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.