सर्वाधिक इच्छुक पिंपरीमध्ये : तीन मतदारसंघांतून एकूण ८९ जणांनी नेले अर्ज
भोसरी विधानसभा १३ जणांनी नेले ३८ अर्ज, यावेळी दिग्गजही अपक्ष लढणार?
पिंपरी – उमेदवारी अर्ज वाटप सुरू होताच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवार (दि. 27) पासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत शुक्रवारपर्यंत (दि. 4) आहे. बुधवारी सार्वजनिक सुट्टी असल्याने अर्ज भरण्यास केवळ तीनच दिवस शिल्लक आहेत. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदारसंघातून उमेदवारीसाठी एकूण 89 जणांनी 213 इतके अर्ज नेले आहेत. अर्ज नेणाऱ्यांमध्ये सर्वपक्षीय दिग्गजांचा समावेश असल्याने यंदा राजकीय रिंगणात चांगलीच लढत रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघातून 13 जणांनी 38 अर्ज नेले आहेत. विशेष म्हणजे माजी आमदार विलास लांडे आणि भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज नेल्याने राजकीय परिघात नव्या चर्चांना उधाण आले आहे. तर भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी भाजपच्या नावाने अर्ज घेतला आहे.
सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष म्हणून अर्ज नेला. भाजप नगरसेवक रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून अर्ज नेत बंडाचे निशाण फडकावले आहे. माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांच्यासह अन्य दोघांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नावाने अर्ज नेले आहेत.
एकेकाळी राष्ट्रवादीचे शहरातील मातब्बर नेते म्हणून विलास लांडे यांची ओळख होती. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लांडे यांनी पक्षापासून चार हात लांब राहण्याची भूमिका स्वीकारली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे त्यांनी उमेदवारी मागितली होती. मात्र, अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा अचानकपणे प्रवेश घडवून आणत त्यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ राष्ट्रवादीने घातली. त्यामुळे लांडे प्रचंड नाराज झाले होते. मात्र, त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षश्रेष्ठींना यश आले.
लांडे यांनी जीव ओतून डॉ. कोल्हेंचा प्रचार केला. परंतु, निवडणुकीनंतर पक्षाने पुन्हा आपल्याकडे दुर्लक्ष केल्याची भावना लांडे यांच्या मनात बळावली आहे. तसेच त्यांनी केलेल्या सर्वेक्षणात शिवसेना अथवा अपक्ष हा पर्याय त्यांच्यासाठी सोयीस्कर असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून लांडे यांनी “मातोश्री’ शी जवळीक वाढविली होती. आहे. मात्र, शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष म्हणून त्यांनी आज अर्ज नेल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांचे पुतणे असलेले रवी लांडगे भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांचे मागील काळात आमदार महेश लांडगे यांच्याशी बिनसले आहे. तर दुसरीकडे विलास लांडे यांच्याशी त्यांचे सूर जुळू लागले आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत दत्ता साने यांनी महेश लांडगे यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचार केला होता. विलास लांडे यांच्या पराभवासाठी त्यांनी दिवस-रात्र एक केला होता. मात्र, दत्ता साने यांनी महेश लांडगे यांच्याशी फारकत घेत विलास लांडे यांच्याशी जुळवून घेतले आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोसरी विधानसभा मतदार संघात मोठ्या घडामोडींची शक्यता वर्तविली जात आहे.