पिंपरी -गणराया सगळ्यांची इच्छा पूर्ण करतात. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे मनापासून काम करतात. गणरायांनी राज ठाकरे यांना यश द्यावे. आगामी महापालिकेत दोन आकडी नव्हे तर तीन आकडी नगरसेवकांची संख्या होऊन महापालिकेत मनसेचा महापौर बसावा, असे गणरायाला साकडे शहर मनसेच्या महिला आघाडीच्या सचिव सीमा बेलापूरकर यांनी घातले.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये श्रीं ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी मनसेचे पदाधिकारी आले होते. त्या वेळी महिला आघाडीच्या सचिव सीमा बेलापूरकर यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. मनसे महिला आघाडी सातत्याने महिलांवर होणारे अत्याचार, गुन्ह्यांसंदर्भात वेळोवेळी आवाज उठवत असते.
महिलांच्या अनेक प्रश्नांवर शहर महिला आघाडीच्या वतीने आंदोलनातून प्रश्नांना वाचा फोडली जाते. करोना काळात विधवा झालेल्या महिलांना मनसे महिला आघाडीच्या वतीने रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. करोनामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पालक गमावले आहेत, अशा विद्यार्थ्यांची फी माफ व्हावी, यासाठी महिला आघाडी शाळेत जाऊन प्रयत्न केल्याचेही बेलापूरकर यांनी सांगितले.