विद्यार्थी, पालक, शिक्षक त्रस्त
गुरुवारी सायंकाळी उशिरा पोर्टल पूर्ववत
नारायणगाव – पुणे जिल्ह्यात अल्पसंख्यांक व बेगम हजरत महल शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणिकरण करण्याचे आदेश जिल्हा परिषद पुणेचे शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडून प्राप्त झालेले असल्याने शाळांनी एनएसपी पोर्टलच्या माध्यमातून काम सुरू केले होते. परंतु मंगळवार (दि. 15) पासून एनएसपी पोर्टलचा खेळ खंडोबा झाला असून पोर्टल पूर्णपणे बंद पडले आहे. त्यामुळे एनएसपी शिष्यवृत्तीस पात्र असलेल्या विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणिकरण होत नसल्याने विद्यार्थी, शिक्षक व पालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, दोन दिवसांनंतर गुरुवारी (दि. 17) सायंकाळी उशिरा पोर्टल पूर्ववत सुरू झाले आहे.
एनएसपी पोर्टल सोमवारी (दि. 14) व्यवस्थित चालू होते; मात्र मंगळवार (दि. 15) पासून आजतागायत म्हणजेच गुरुवार (दि. 17) पर्यंत पोर्टल बंद असल्याने अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची व्हेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही. मागील वर्षात शिक्षण घेतलेले अनेक अल्पसंख्यांक विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी बाहेरगावी गेलेले आहेत. अशा शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांना व्हेरिफिकेशनसाठी संबंधित शाळांकडून बोलावून घेण्यात आले; परंतु पोर्टल बंद असल्याने बाहेर गावावरून आलेल्या विद्यार्थ्यांचे, केंद्र चालकांचे व पालकांचे अतोनात हाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रशासनाने मागील आठवड्यात मुख्याध्यापक व नोडल ऑफिसर यांचे बायोमेट्रिक प्रमाणिकरण करण्याचे काम पूर्ण केले आहे. सोमवार (दि. 14) पासून मागील वर्षी शिक्षण घेतलेल्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांची एनएसपी पोर्टलमध्ये माहिती भरण्यास सांगितले; परंतु प्रशासनाने शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी निर्माण केलेल्या केंद्रांची संख्या कमी असल्याने व पोर्टल बंद पडल्याने विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणिकरण अत्यंत कमी प्रमाणात झालेले दिसून येते.
मुख्याध्यापक तणावात…
शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिकचे काम पूर्ण न झाल्यास आपला शाळेतील विद्यार्थी बोगस आहे असे समजून त्या शाळेची सीबीआय चौकशी केली जाणार अशी भीती प्रशासनाकडून घातली जात असल्याने मुख्याध्यापकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झालेले दिसून येते.
एनएसपी पोर्टल सुरू झाल्याशिवाय अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणिकरण करता येत नव्हती. जोपर्यंत पोर्टल सुरू होणार नाही, तोपर्यंत मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाणार नाही. अनेक टेक्निकल अडचणी असल्याने मुख्याध्यापक पूर्ण करू शकत नाही. पूर्वी बोनाफाईडवर काम करता येत होते; परंतु आता ते होत नाही. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन मागविले असून मार्ग निघेल अशी अपेक्षा आहे. शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना कालावधी वाढवून मागणार आहोत.
– अनिता शिंदे, गटशिक्षणाधिकारी, जुन्नर