मुंबई – अभिनेता सनी देओलच्या ‘गदर 2’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 10 दिवसांत 300 कोटींचा गल्ला जमावला आहे. या चित्रपटाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. यातच आता दिग्दर्शक करण जोहरने देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असलेल्या गदर 2 चित्रपटाचे कौतुक केले आहे.
एका मुलाखतीत करण जोहर म्हणाला, “गदर 2 ने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. कारण हा एक असा सिनेमा आहे जो 2001 मध्ये सुपरहिट झाला होता आणि आता 2023 मध्ये रेकॉर्ड तोडत आहे. मी सिंगल स्क्रीन्ससाठी खूप खूश आहे. तुमच्या विश्वासामुळेच आज सिनेमे चालत आहेत. मी यासाठी कोणाकडेच मान्यता मागत नाही. ना सोशल मीडियाकडे ना फिल्म समीक्षकांकडे. प्रत्येकजण संवेदनांना आकर्षित करण्यासाठी फिल्म बनवत आहे. भविष्यातही असंच किंवा यापेक्षा जास्त होणार आहे. प्रत्येक वर्षी अशीच लाट येईल.”
या चित्रपटाने 300 कोटींची कमाई केल्यानंतर लवकरच 500 कोटींचा टप्पा पार करेल अशी अपेक्षा निर्माते व्यक्त करत आहेत. सध्या सगळीकडेच या सिनेमाची हवा पाहायला मिळत आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी करणचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. यात अभिनेता रणवीरसिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच काय तर या चित्रपटातील ‘व्हॉट झुमका’ हे गाणं देखील सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.