सोनई, (वार्ताहर) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोनई येथील मुळा पब्लिक स्कूलच्या आमराई गेस्ट हाऊसमध्ये दोन ते तीन- दिवसांपासून गडाख गटाच्या कार्यकर्त्यांच्या गटवाईज बैठका सुरू आहेत. यामध्ये लोकसभा निवडणुकीबाबत कार्यकर्त्याकडून मते जाणून घेतली जात आहेत. यामध्ये कार्यकर्त्यांमधून खासदार लोखंडे यांच्याविरुद्ध वेगळा सूर ऐकावयास मिळत आहे.
आमदार शंकरराव गडाख यांनी नेवासा, चांदा, खरवंडी, घोडेगाव, सोनई आदी गावांतील कार्यकर्त्याकडून लोकसभेबाबतचा कल जाणून घेतला. अनेक कार्यकर्त्यांनी खासदार लोखंडे यांच्या कार्यपद्धतीवर टीकाटिपणी करत उबाठा गटाच्या उमेदवारांच्या बाजूने झुकते माप देणार असल्याचे कार्यकर्त्यांमधून ऐकावयास मिळत आहे.
खासदार लोखंडे यांच्या बाबतीत उघड उघड कार्यकर्ते टीका करत आहे. मागच्या वेळेला लोखंडे यांच्यावर विश्वास ठेवून मतदारांनी त्यांना भरभरून मते टाकली, मात्र पाच वर्षात त्यांना त्याचा विसर पडला. या भागात कधी त्यांनी दर्शनच दिले नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराला नेवासा तालुक्यातून झुकते माप देऊन तालुक्यातून आघाडी मिळवून देण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये रस्सीखेच राहणार असल्याचे या निमित्ताने स्पष्ट झाले आहे.
नेवासा तालुका हा शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये असल्याने येथे शिंदे गटाकडून खासदार सदाशिव लोखंडे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे निवडणूक रिंगणात आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये नेवासा तालुक्यामध्ये खासदार लोखंडे यांच्याकडून कुठलेच असे भरीव काम झाले नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये खासदार लोखंडे यांच्याविरुद्ध तीव्र नाराजीचा सूर दिसून येतो आहे.
पहिली निवडणूक झाल्यानंतर सदाशिव लोखंडे यांना दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेस त्यांना मतदारांची आठवण झाली का असा नाराजीचा सूर ऐकायला येत आहे. खासदार लोखंडे यांचा नेवासा तालुक्यात तसा जनसंपर्क फारच नगण्य असाच राहिला आहे. त्यामुळे तालुक्यामध्ये ते जरी शिंदे गटाचे उमेदवार असले तरी खासदार लोखंडे यांनी मतदारसंघामध्ये कुठल्या कार्यकर्त्याची अडचण सोडविली ,
कुठले विकासात्मक काम केले, किती कार्यकर्त्याला भेटले, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये लोखंडे यांच्या बाबतीत उदासीनता कार्यकर्त्याच्या बोलण्यातून दिसून येत आहे. गडाख गटातून प्रत्येक जिल्हा परिषद गटातील व पंचायत समिती गणातील कार्यकर्त्याची मते जाणून घेऊ योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, मात्र या बैठकांमधून गडाखांच्या कार्यकर्त्यांचा सूर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्याकडेच दिसून येतो.