नवी दिल्ली – गेल्या सहा महिन्यात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात कोसळले असल्यामुळे आयातदार हैराण असतानाच जून महिन्यात चालू खात्यावरील तूट मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. कारण परकीय व्यापारातील तूट वाढली आहे. त्यामुळे रुपयावरील मूल्यावर आणखी दबाव येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार जून महिन्यामध्ये निर्यात 16 टक्क्यांनी वाढली असली तरी परकीय व्यापारातील तूट 25 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात परकीय व्यापारातील तूट केवळ 9 अब्ज डॉलर इतकी होती.
आता एप्रिल ते जून या कालावधीत परकीय व्यापारातील तूट वाढवून 70 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीमध्ये परकीय व्यापारातील तूट केवळ 31 अब्ज डॉलर इतकी होती.