पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आणीबाणी काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार आणि एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना पाच हजार रुपये पेन्शन देण्यात येते. राज्यातील 4 हजार 482 नागरिकांना ही पेन्शन देण्यात येते.
जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची पेन्शन देण्यासाठी शासनाने 9 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 586 नागरिकांना आणीबाणीच्या काळातील पेन्शन मिळत आहे.
भारतामध्ये 25 जून 1975 ते 31 मार्च 1977 या कालावधीत आणीबाणी घोषित करण्यात आली होती. या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदीवास सोसावा लागला, अशा व्यक्तींना 2018 पासून पेन्शन देण्यास सुरुवात झाली. दरम्यान, 2020 महाविकास आघाडीच्या काळात ही योजना बंद करण्यात आली. त्यानंतर पुन्हा शिंदे-फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर 2022 पासून ही योजना पुन्हा सुरु करण्यात आली.
त्यानुसार जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची पेन्शन देण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त कारवास भोगलेल्या व्यक्तींना मासिक दहा हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस अथवा पतीस पाच हजार रुपये मानधन देण्यात येईल; तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तींना मासिक पाच हजार रुपये, तर त्यांच्या पश्चात पत्नीस अथवा पतीस अडीच हजार रुपये मानधन देण्यात येते.