पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर स्थगित करुन दिनांक 31 मे 2024 पर्यंत पुढे ढकलण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. यामुळे राज्यातील विविध सहकारी संस्थांच्या सुमारे 38 हजार 740 सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत.
लोकसभेच्या निवडणूक पुर्वतयारी कामकाजासाठी सहकार विभागातील अधिकारी, कर्मचार्यांच्या सेवा संबंधित जिल्हाधिकारी यांनी अधिग्रहित केलेल्या असणे, सहकार विभागाकडील तालुका, जिल्हा व प्रादेशिक स्तरावर मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी पदे रिक्त आहेत.
निवडणूकीस पात्र असलेल्या राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरळित, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73क मध्ये निवडणुका पुढे ढकलण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.
दरम्यान, नामनिर्देशनाचा टप्पा सुरु झालेल्या 1100 सहकारी संस्था तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार्या संस्थांच्या निवडणुका सुरू राहतील, अशी माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनी दिली.
सहकारी संस्थांची स्थिती
93 हजार 342 पैकी : एकूण संस्था
50 हजार 238 : संस्थांची निवडणूक पूर्ण
10 हजार 783 : संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू
20 हजार 130 : संस्थांची निवडणूक प्रक्रिया प्रलंबित
7 हजार 827 : संस्था यंदा निवडणुकीस पात्र
(सर्व माहिती : दि. 31 डिसेंबर 2023 अखेर)