महामंडळाला वर्षभरात साडेतेवीस कोटींवर “गंगाजळी’
प्रशांत घाडगे
पुणे – एस.टी.च्या परराज्यातील फेऱ्यांना प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यातून पुणे विभागाला जानेवारी ते डिसेंबर 2019 या काळात 23 कोटी 64 लाख 45 हजार 613 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 2018 सालच्या तुलनेत 2019 साली एसटीच्या तिजोरीत 4 टी 11 लाख 17 हजार 298 रुपयांची वाढ झाली आहे.
शिवाजीनगर, स्वारगेट, पुणे स्टेशन, वल्लभनगर या आगारांतून परराज्यात बस फेऱ्या सुरू असतात. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरच्या राज्यातील विद्यार्थी, नोकरवर्ग, बांधकाम मजुरांची संख्या आहे. या प्रवाशांसाठी आंध्रप्रदेश, तेलंगणा, गुजरात, गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांत बससेवा सुरू आहे. परराज्यात जाण्यासाठी महामंडळाने प्रवाशांना वातानुकूलित बससेवा उपलब्ध करुन दिली असून शिवनेरी व शिवशाही या बसही या प्रवाशांच्या सेवेत आहेत. या फेऱ्यांना परराज्यातील नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रवासी सत्यवान चौधरी म्हणाले, “मी वर्षातून तीन वेळा इंदौरला जातो. दरवेळेस एसटीचा सुरक्षित प्रवास असल्याचे दिसून आले. एसटीच्या सुविधा उत्तम असून आरक्षणही उपलब्ध होत असल्याने गावी जाण्यासाठी एसटीला पसंती देतो.’
दरम्यान, परराज्यांताणा मागणीनुसार वाढवण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या शहरांना पुरविली जाणारी बससेवा
शिवाजीनगर, स्वारगेट, वल्लभनगर या आगारांतून परराज्यांत बससेवा पुरविली जाते. यामध्ये बडोदा, सुरत, इंदौर, गोवा (पणजी), बेळगाव, गुलबर्गा, हैदराबाद या शहरांत पुणे विभागातून फेऱ्या सुरू आहेत.
परराज्यांत जाणारे प्रवासी पुणे विभागातून जाणाऱ्या बसफेऱ्यांना चांगला प्रतिसाद देत आहेत. पुणे विभागातून 2019 साली चांगले उत्पन्न मिळाले आहे. याचबरोबर, महामंडळाकडून प्रवाशांना सुरक्षित व उत्तम सेवा दिली जात आहे.
यामिनी जोशी, विभागीय वाहतूक नियंत्रक (एस.टी), पुणे विभाग
राज्यनिहाय बस फेऱ्यांतून मिळालेले उत्पन्न (2019)
* आंध्रप्रदेश – 2 कोटी 75 लाख 72 हजार 351
* गुजरात – 2 कोटी 20 लाख 91 हजार 917
* कर्नाटक – 10 कोटी 24 लाख 14 हजार 692
* मध्यप्रदेश – 1 कोटी 51 लाख 33 हजार 238
* गोवा – 6 कोटी 92 लाख 33 हजार 515