त्रासाला सगळेच कंटाळले : 25 महिला कर्मचाऱ्यांनी केली स्वत:च्या बदलीची मागणी
वाघापूर -परिंचे (ता. पुरंदर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील एका कर्मचाऱ्याने आरोग्य केंद्राचा अनैतिक कृत्यांसाठी अड्डा बनविला आहे. रात्री बेरात्री आरोग्य केंद्रात दारू पिऊन गोंधळ घालणे, महिला कर्मचाऱ्यांना अरेरावीची भाषा करणे, तसेच बाहेरील महिलेला घेऊन तिच्यासोबत रात्रभर अनैतिक कृत्य करणे, यासाठी महिला कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे. असे प्रकार वाढले असून त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दाद मागूनही फरक न पडल्याने थेट गावच्या ग्रामसभेत या अन्यायाला वाचा फोडली आहे. तसेच संबंधित कर्मचाऱ्याला गावातून हाकलून न दिल्यास स्वतःच्या बदल्या इतरत्र करण्याची मागणी केली आहे. यामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून महिला कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रायगड जिल्ह्यातूनही केले होते हद्दपार
विशेष म्हणजे धनाजी म्हारनुर हा कर्मचारी यापूर्वी रायगड जिल्ह्यात कार्यरत असताना अशाच स्वरूपाचे चाळे करीत होता. त्यामुळे त्यास जिल्हा परिषदेने निलंबित करून जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार केले आहे. पुरंदर तालुक्यात आल्यानंतरही अशाच स्वरूपाचे चाळे सुरू असून हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरु आहेत. त्यामुळे परिंचे गावाबरोबरच संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. तसेच महिला कर्मचारी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
परिंचे येथील आरोग्य केंद्रातील तब्बल 25 महिला कर्मचाऱ्यांनी या कर्मचाऱ्याच्या कृष्ण कृत्यांचा पाढाच जाहीरपणे वाचला आहे. धनाजी म्हारनुर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो आरोग्य केंद्रात औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत आहे. याबाबत संबंधित आरोग्य सेविका, परिचर, पर्यवेक्षिका यांनी एका लेखी अर्जाद्वारे ग्रामपंचायतीकडे न्याय मागितला आहे. यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, धनाजी महारनुर हा स्त्री लंपट स्वभावाचा असून त्याची कामकाजाची पद्धत अतिशय आक्षेपार्ह आणि घृणास्पद आहे.
आरोग्य केंद्रात रात्रपाळीस महिला कर्मचारी कामावर असताना बाहेरील महिलेला घेवून येतात तसेच जोरजोरात दरवाजा वाजवून शांतता भंग करतात. त्याच प्रमाणे रिपोर्टच्या नावाखाली काम करायचे असे म्हणून सर्व विद्युतपुरवठा बंद करतात तसेच मला विचारल्याशिवाय लाईट लावायची नाही अशी तंबी देतात. तसेच संबंधित महिलेला सलाइन लावून तिच्याशी सर्वांसमोरच अश्लील चाळे करीत बसतात. त्याचप्रमाणे ज्या विभागात औषधांचा साठा ठेवलेला आहे, त्या औषध भांडारा मध्येही ही महिलेला घेवून रात्र घालवीत असतात. विशेष म्हणजे ते रात्रीच्या वेळी नियमितपणे दारू पिऊन गोंधळ घालीत असताना त्यांना विरोध केल्यास त्यांना राजकीय नेत्यांबरोबर काढलेले फोटो दाखवून बदली करण्याची धमकी दिली जाते.
द्विस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत सोमवारी चौकशी करून तातडीने कारवाई केली जाईल. एक महिला म्हणून या कर्मचाऱ्यावर कारवाई होण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेत असून महिला कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण होईल, तसेच रुग्णांवर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी प्रयत्न केले जातील. या प्रकारणात कोणताही मुलाहिजा न बाळगता सक्त कारवाई करून त्यास पुणे जिल्ह्याच्या बाहेर घालविले जाईल.
– निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद
आरोग्य विभागाला संबंधित तक्रार प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने खातेनिहाय चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. चौकशी पूर्ण होताच कडक कारवाई केली जाईल. तोपर्यंत त्या कर्मचाऱ्यास परिंचे गावात पाठविले जाणार नाही.
– डॉ. अभय तिडके, आरोग्य अधिकारी, पुरंदर तालुका तथा जिल्हा परिषदेचे अतिरिक्त आरोग्य अधिकारी
याबाबत सर्व माहिती मिळाली असून संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वीच सुनावले आहे. तसेच आरोग्य केंद्रावर याचा कोणताही परिणाम न होता आरोग्य सेवा सुरळीतपणे चालावी यासाठी या कर्मचाऱ्याला गावाबाहेर हाकलण्यात आले आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करून त्यास जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करून कडक कारवाई केली जाईल.
– दिलीप यादव, सदस्य, जिल्हा परिषद
याबाबत सर्व माहिती मिळाली असून संबंधित कर्मचाऱ्याला यापूर्वीच सुनावले आहे. तसेच आरोग्य केंद्रावर याचा कोणताही परिणाम न होता आरोग्य सेवा सुरळीतपणे चालावी यासाठी या कर्मचाऱ्याला गावाबाहेर हाकलण्यात आले आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत हा विषय उपस्थित करून त्यास जिल्ह्याच्या बाहेर हद्दपार करून कडक कारवाई केली जाईल.
– दिलीप यादव, सदस्य, जिल्हा परिषद
हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे. जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती प्रमोद काकडे यांना निवेदन देण्यात आलेले असून तातडीने कारवाई कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच हा कर्मचारी पुन्हा गावात आल्यास आरोग्य केंद्राला टाळे ठोकले जातील. तसेच आरोग्य केंद्रात सीसीटीव्ही यंत्रणा बसविणार आहे.
– हिना नवले, सरपंच, परिंचे गाव