नवी दिल्ली – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यावर्षी २६ जानेवारी २०२४ रोजीच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याआधी भारताने राष्ट्रपती बिडेन यांना प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी पुढील वर्षी जानेवारीमध्ये क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेचे आयोजन करण्याचा एक भाग म्हणून आमंत्रित केले होते. मात्र, काही कारणांमुळे त्यांनी जानेवारीत येथे येण्यास असमर्थता व्यक्त केली. यानंतर फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांना प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरून जुलैमध्ये फ्रान्सला गेले होते. बॅस्टिल डे परेडमध्ये सहभागी होत असताना दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. बॅस्टिल डे सोहळ्यात मोदी सन्माननीय अतिथी म्हणून सहभागी झाले होते. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा २५ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी फ्रान्सला भेट दिली.
सूत्रांनी सांगितले की २०२४ च्या शेवटी क्वाड समिट भारतात आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. पंतप्रधान मोदी यांनी मे महिन्यात जपानमधील हिरोशिमा येथे झालेल्या जी-७ शिखर परिषदेच्या वेळी जाहीर केले होते की भारत क्वाड नेत्यांच्या पुढील शिखर परिषदेचे आयोजन करेल. क्वाडमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान यांचा समावेश आहे.