पुणे – महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या पार्किंगमध्येच दोन अधिकाऱ्यांच्या वाहन चालकांमध्ये हाणामारी घडल्याचा प्रकार आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला होता. दरम्यान, या ठिकाणी उपस्थित असलेल्या वाहनचालकांनी हा वाद सोडविल्यानंतर एका चालकाने शिवाजीनगर पोलीस चौकीत मारहाणीची तक्रार दाखल केली आहे.
दुपारी अडीच्या सुमारास आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्यांचा चालक पार्किंगमध्ये असताना, दुसऱ्या एका अधिकाऱ्याच्या चालकाशी त्यांची शाब्दीक बाचबाची झाली. त्यानंतर दोन्ही चालक आक्रमक झाले आणि त्यांच्यात थेट हाणामारीलाच सुरुवात झाली. या प्रकारामुळे या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला, त्यातच दुपारच्या जेवणाची सुट्टी असल्याने अनेक कर्मचारी महापालिकेच्या इमारतीसमोरील हिरवळ तसेच पार्किंगमध्ये सावलीत थांबले होते. या प्रकारामुळे या ठिकाणी मोठी गर्दी झाली.
त्यानंतर सुरक्षारक्षकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटविला. मात्र, या प्रकाराने संतापलेल्या एका वाहकाने सुरक्षा रक्षकासह थेट पोलीस चौकी गाठत मारहाणीची तक्रार दिली असल्याचे महापालिकेच्या सुरक्षा विभागाकडून सांगण्यात आले.