कोथरूड – करोना काळात गर्दी जमवून नियम डावलल्याप्रकरणी नगरसेवक किरण दगडेपाटील यांच्याविरुद्ध कोथरूड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विरोधकांनी दबावतंत्र आणून हा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडल्याचा आरोप दगडेपाटील यांनी केला आहे.
प्रभाग क्रमांक 10 येथे किरण दगडे यांनी नागरिकांसाठी मोफत काशी यात्रेचे आयोजन केले होते. मात्र, करोनाची तिसरी लाट सुरू झाल्यामुळे ही यात्रा तात्पुरती पुढे ढकलण्यात येत असल्याचे सांगण्यासाठी दगडे यांनी नागरिकांना एकत्र बोलावले.
त्यावेळी झालेल्या गर्दीमुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणानंतर कोथरूडमध्ये राजकारण तापले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरम्यान, करोनामुळे प्रस्तावित काशियात्रा तात्पुरती स्थगित करत असल्याची माहिती देण्यासाठी मोजक्याच लोकांना बोलावले. त्यावेळी सर्व नियम पाळून पंधरा मिनिटांत बैठक संपवली. मात्र, परिसरातील अन्य नागरिक आल्यामुळे गर्दी झाली. त्याबाबत आम्ही दंडही भरला.
मात्र, केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विरोधकांनी पोलिसांवर दबाव आणून माझ्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. शहरात सत्ताधाऱ्यांच्या आंदोलनात मोठी गर्दी होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत, मग आमच्यावर का? विरोधकांना त्यांचा पराभव आत्ताच दिसतोय. त्यामुळे या कुरघुड्या सुरू आहेत,’ असे किरण दगडे पाटील यांनी म्हटले आहे.