नगर -जिल्ह्यात लम्पी स्किन आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग उपाययोजना करत आहे. अरणगाव रोड येथील पांजरापोळ गोरक्षण संस्थेस पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुनील तुंबारे यांनी भेट देऊन येथील जनावरांची तपासणी केली. शासनाच्या वतीने वैयक्तिक सांभाळ करणाऱ्या सर्वच जनावरांचे लसीकरण मोफत केली जाणार असून, संबंधितांनी टोल फ्री क्र.1962 या क्रमांकावर संपर्क साधल्यास डॉक्टर स्वत: येऊन लस देतील, असे डॉ. तुंबारे यांनी सांगितले.
या आजारावर उपाय म्हणजे लसीकरण करणे, गोठे व जनावरे स्वच्छ ठेवणे जेणेकरुन किटक, डास, माशांचा प्रादुर्भाव होणार नाही. गोठ्यामध्ये हवा खेळती ठेवणे. लिंबांचा पाला जाळून त्याचा धूर करणे, करंज तेल, कापूर व शॉम्पू याचे मिश्रण करुन गोठ्यामध्ये दोन वेळेस फवारणी करणे म्हणजे गोठयात या रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही व यामुळे या रोगास निश्चित प्रतिबंध होईल. याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी संस्थेचे सचिव किशोर मुनोत, व्यवस्थापक महेश मुनोत, डॉ. विष्णू फुलसौंदर, राजकुमार पितळे, शांतीलाल चंगेडे उपस्थित होते.