पुणे- करोनाकाळात मनपा सेवक आणि त्यांच्या कुटुंबीयांना आता अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेत 100 टक्के महापालिकेकडून देण्यात येणार आहे. यापूर्वी या उपचाराच्या खर्चात 10 टक्के रक्कम कर्मचारी, तर 90 टक्के रक्कम महापालिका देत होती. या निर्णयाचा लाभ 17 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
रासने म्हणाले, ‘करोनाच्या काळात महापालिकेचे सेवक फ्रंटलाइन वर्कर म्हणून कार्यरत आहेत. अनेक सेवकांना करोनाची लागण झाली. काही जणांना प्राण गमवावे लागले. करोनामुळे सेवकांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावली आहे. अंशदायी वैद्यकीय सहाय्य उपचार योजनेअंतर्गत उपचारांसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येत होते. ते वाढवून 100 टक्के करण्यात आले आहे. महिला आणि बालकल्याण समितीने याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी सादर केला होता. त्यानुसार, या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.’