देहूरोड – देहूरोड परिसरातील मुर्गन व घोरावडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वनविभागाच्या हद्दीतील वृक्षराजींमध्ये माणसांच्या हालचालींना न भिता “प्यॉऊं, प्यॉऊं’ चा साद घालत पक्षांचा राजा मोर चारा खाऊन पाणी पिऊन जात आहे. हे चित्र निसर्गप्रेमींना नक्कीच सुखावणारे आहे.
पहाटेच्या वेळी व्यायामासाठी तसेच दर्शनासाठी घोरावडेश्वर डोंगरावर जाणारे भाविक तसेच आड बाजूने डोंगरावर चढणारे ट्रॅक्टर्स यांना पाहून मोर पक्षी आर्त हाक देत आहेत.जणू ते त्यांना आपल्या भाषेत तुम्ही व्यायामाला आलात; तर आमच्यासाठी काही खाद्य आणलं का अशा नजरेनेही पाहत, डोळे मिचकावत, साद घालत आहेत. त्यामुळे निसर्गप्रेमी, व्यायामाला, दर्शनासाठी येणारे भाविक व नागरिकही पक्ष्यांसाठी ज्वारी,बाजरी,गहू, कडधान्य असे खाद्यसोबत आवर्जुन घेऊन येत आहेत.
दोन वर्षांपूर्वी सुरू असलेल्या करोना काळात नागरिकांना लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता येत नव्हते. मात्र नियमित व्यायाम करणारी तरुण, पहाटेच्या वेळी मॉर्निंग वॉक करणारे व्यायामप्रेमी, ज्येष्ठ तसेच डोंगरावर येणारे ट्रे कर्स यांनी मुर्गण टेम्पल आणि घोरावडेश्वर डोंगर गाठत व्यायामातील सातत्य कायम ठेवले. शितळानगर येथील रामशरण विरमणी या टेम्पो चालकाने मुर्गन टेम्पलच्या पायथ्याला टाकाऊ वस्तुंपासून ओपन जम तयार केली. येथे नागरिकही व्यायामासाठी येऊ लागले.
प्रल्हाद खरात , चंद्रमणी बनसोडे, सुरेश वैरागर, मनोज परदेशी यांसह अनेक निसर्गप्रेमींनी परिसरातील पक्षांवर लक्ष केंद्रित करीत, वृक्षारोपण व संवर्धन ,स्वच्छता राखत पक्ष्यांना धान्य आणू लागले आहेत.त्यामुळे मोरांना चारा-पाणी सहज उपलब्ध होत आहे.
मोरांनीही फुलविला पिसारा
माणसांच्या हालचालींच चाहूल लागली, तरीदेखील क्षणात उडून जाणाऱ्या मोरांची आता याठिकाणी चारा-पाण्याची व्यवस्था झाल्याने हे मोर आता ठराविक अंतरावरील मानवी हालचालींकडे फारसे लक्ष देत नाहीत. चारा-पाणी खाऊन झाल्यानंतर सकाळी साडे सात वाजल्यानंतर हे मोर पुन्हा वृक्षराजीमंध्ये वास्तव्याला निघुन जात आहेत. यानिमित्ताने बालगीतामधील “इथं-इथं बस रे मोरा, चारा खा ,पाणी पी, भुर्रर्र उडून जा’ चा अनुभव येत आहे.