औंध -खटाव तालुक्यातील वडी येथे विशाल आप्पासाहेब येवले (वय 24) याचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरगुती वादातून बुधवारी (दि. 27) रात्री ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी औंध पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून, एकाचा शोध सुरू आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वडी येथील पोपट मोहन येवले (वय 45),मनोज मोहन येवले (वय 36), वैशाली मनोज येवले (वय 30), वंदना पोपट येवले (वय 41) व मुलगा करण पोपट येवले (वय 19) यांच्यात काल (दि. 27) रात्री घरगुती वाद झाला. त्याचे रूपांतर मारामारीत झाले. या भांडणात विशाल येवले याच्यावर वार करण्यात आल्याने, त्याला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला.
यानंतर औंध पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. त्यामध्ये दोन महिलांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे. श्वानपथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्री उशिरा घटनास्थळी दाखल झाले होते. यातील संशयित किरण येवले हा पळून गेला असून, त्याचा शोध सुरू असल्याची माहिती सपोनि प्रशांत बधे यांनी दिली.