राजगुरूनगर-लॉकडाऊनच्या काळात कोणीही गरीब गरजू उपाशी राहू नये म्हणून येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून राजगुरूनगर एसटी बस स्थानकात तब्बल 200 नागरिकांना मोफत जेवणाची सोय शुक्रवारपासून (दि. 10) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राजगुरूनगर शहरात सुरुवातीपासून बजरंगदलाच्या कार्यकर्त्यांनी हा उपक्रम सुरु करून दररोज 200 पेक्षा जास्त नागरिकांना जेवणाची घरपोच सुविधा उपलब्ध दिली आहे. त्यानंतर शिवभोजन थाळी शहरात सुरु झाली त्यातून 100 लोकांना एकवेळचे जेवण दिले जात आहे. आता हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन, जैन श्रावक संघाच्या माध्यमातून 200 नागरिकांना जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. चाकण परिसरातील सुमारे तीन हजार नागरिकांना जेवण दिले जात आहे. तर 30 हजारांच्यावर किराणा व जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यासाठी चाकण एमआयडीसीमधील कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे.
राजगुरूनगर येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन व जैन श्रावक संघाच्या वतीने येथील एसटी बस आगाराच्या आवारात भोजनाची व्यवस्था करण्यात आली. त्यासाठी नाके गरीब गरजू कुटुंबांनी सोशल डिस्टंस ठेवत रांगेत उभे राहून हे जेवण घेतले. फाउंडेशन व जैन श्रावक संघाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे.