जेजुरी -महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थान समितीच्या वतीने (दि.24) फेब्रुवारी 2022 रोजी जेजुरी येथे सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा होणार आहे. देवसंस्थान कार्यालयात नोंदणी सुरू केल्याची माहिती प्रमुख विश्वस्त पंकज निकुडे यांनी दिली.
देवसंस्थान समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी विश्वस्त शिवराज झगडे, राजकुमार लोढा, संदीप जगताप, ऍड. अशोकराव संकपाळ, सॉलिसीटर प्रसाद शिंदे, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप उपस्थित होते.
आपल्या मुला-मुलीचा विवाह करताना सर्वसामान्य शेतकरी, आर्थिकदृष्टया दुर्बल व कामगारांना कर्जबाजारी होण्याची वेळ येऊ नये, अन्न, वेळ, परिश्रम, पैशांची बचत व्हावी, यासाठी सामाजिक बांधिलकीतून राज्याचे तत्कालीन धर्मादाय आयुक्त शिवकुमार डीगे व पुणे विभागाचे सहधर्मदाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांच्या संकल्पनेतून 2018 मध्ये सर्वधर्मीय बिगरहुंडा मोफत सामुदायिक विवाह सोहळा ही चळवळ राज्यात देवसंस्थान,
सामाजिक संस्थांने राबविण्यास सुरुवात झाली. मराठवाड्यासह राज्यातील अनेक कुटुंबीयांना चळवळीत सहभागी होता आले. जेजुरी देवसंस्थानच्या वतीने 2018 व 2019 असे दोन वर्षे विवाह सोहळे घेण्यात आले. दोन्ही सोहळ्यात बौद्ध धर्मीय परंपरेनुसार मंगल परिणय घेतले होते. मात्र, महामारीच्या काळात दोन वर्षे सोहळे झाले नाहीत.
यंदा जेजुरी येथे सोहळ्याचे आयोजन केले असून एप्रिल 2022 मध्ये दुसरा विवाह सोहळा मराठवाड्यात होणार आहे. सोहळ्यात वर-वधूला बूट चप्पल, दोन पूर्ण पोशाख, मणीमंगळसूत्र, चांदीची जोडवी, संसारपयोगी भांडी, वऱ्हाडी मंडळींची व्यवस्था आदी सुविधांसह मोफत केली आहे.
वधू- वरांच्या धर्माच्या रितिरिवाजानुसार धार्मिक विधी केले जाणार असून सर्व खर्च देवसंस्थानच्या वतीने करण्यात येणार आहे. करोनाच्या नियमांचे पालन करूनच हा सोहळा होणार असून अधिक माहितीसाठी इच्छुक परिवाराने श्री मार्तंड देवसंस्थान समिती जेजुरी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाने केले आहे.
मल्हाररत्न पुरस्काराने होणार सन्मान
सामुदायिक विवाह सोहळ्यात 26/11 च्या मुबंई येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मल्हाररत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यापूर्वी अभिनेते नाना पाटेकर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.