पिंपरी – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा फायदा करून देतो, असे सांगून अनेकांना गंडा घालणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी 37 जणांची आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची फसवणूक केली आहे. पिंपळे सौदागर येथे 1 सप्टेंबर 2021 ते 27 जानेवारी 2022 या कालावधीत हा प्रकार घडला. आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
सागर संजय जगदाळे (वय 28, रा. रावेत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह जय मावजी, निजय मेहता, निकुंज शहा, नीलेश शांताराम वाणी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महेश मुरलीधर शिंदे (वय 44, रा., भोसरी) यांनी याप्रकरणी 27
जानेवारी 2022 रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी हे बांधकाम व्यावसायिक आहेत. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीच्या शेअर ट्रेडींग ब्रोकर कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा फायदा देण्याचे आमिष आरोपींनी दाखविले. मात्र गुंतवणूक केलेल्या रकमेवर दरमहा कोणतीही रक्कम फिर्यादीला दिली नाही.
तसेच गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता कंपनीच्या मेटा ट्रेडर फोर या ऍपवर बनावट व खोटा इलेक्ट्रानिक अभिलेख तयार करून फिर्यादीची व इतरांची आठ कोटी 29 लाख 75 हजार 803 रुपयांची आर्थिक फसवणूक केली. इन्फिनॉक्स कॅपिटल कंपनीचे रावेत येथे कार्यालय आहे. या कंपनीतील संचालक व इतरांवर गुन्हा दाखल झाल्याचे माहीत असूनही आरोपी सागर जगदाळे हा इतर आरोपींसोबत मोबाइल व इलेक्ट्रॉनिक माध्यमाव्दारे संपर्कात असल्याचे समोर आले. आरोपीकडे टॅब, दोन मोबाईल, बॅक पासबुक, बॅक चेकबुक व इतर कागदपत्रे त्याच्याकडे मिळून आली. तसेच हवाला करीता वापरलेल्या 10 रुपयाच्या चलनी नोटा देखील पोलिसांनी हस्तगत केल्या.
देशभरातील नागरिकांची फसवणूक
देशभरातील नागरिकांची फसवणूक केल्याचे तपासातून उघडकीस आले आहे. यातील 37 जणांचे जबाब पोलिसांनी नोंदविले आहेत. फसवणूक झालेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक झाली असल्यास तक्रार देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.