नागपूर – सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम राबविणाऱ्या शासकीय कंपन्यांची खोटे व बनावट समरी लिस्ट तयार करून फसवणूकीचा प्रकार आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. दीपक ग्यानीराम आमकर (वय 25) असे या उच्चशिक्षित आरोपीचे नाव आहे. आमकरने शासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली तक्रारदाराची 20 लाखांची केली फसवणूक केली.
यातील फिर्यादीची ‘मिवान इन्फ्रा सोल्यूशन’ नावाने कंपनी आहे. ते शासकीय व खासगी कंपन्यांना स्टेशनरी, फर्नीचर आणि संगणकाचे पार्टस इत्यादी प्रकारचे साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय करतात. आरोपी दिपक आमकर हा उच्च शिक्षित असून व्हीएनआयटीतून शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षणानंतर त्याने सप्लाय वोल्फ इंजिनियर्स प्रा. लि. नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या माध्यमातून शासकीय टेंडर मिळवून देण्याच्या नावाखाली फिर्यादीची 20 लाखांची फसवणूक केली. या संबंधी आर्थिक गुन्हे शाखेतर्फे चौकशी सुरू आहे.
फिर्यादी हे काम मिळण्याच्या शोधात असताना त्यांचे नातेवाईक अभिजीत बल्लेवार यांचा त्यांना फोन आला. “राजस्थान सरकारचे व्हाईसबोट व चॅटबोट टेंडर निघाले आहे. टेंडर व्हॅल्यू 20 कोटी रुपये आहे. सप्लाय वोल्फ इंजिनियर्स प्रा. लि.चे संचालक दीपक आमकर व पंकज धार्मिक यांच्यासोबत आपण संयुक्त भागीदारीत टेंडर भरू शकतो. त्यासाठी 40 लाख रुपये अर्नेस्ट मनी डिपॉझिट भरायचे आहे. यामध्ये 20 लाख रुपये हे आमकर व 20 लाख रुपये आपल्याला भरावे लागेल, असे बल्लेवार यांनी सांगितले.
यानंतर फिर्यादी स्वतः कंपनीचे डायरेक्टर दिपक आमकर यांना भेटले. फिर्यादीने आमकर याच्या मानेवाडा येथील घरी जाऊन टेंडर भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली. यानंतर आरटीजीएस प्रणालीमार्फत आमकर यांच्या कंपनीच्या खात्यात 20 लाख रुपये वळते करण्यात आले. यानंतर वारंवार विचारणा करूनही आमकर टाळाटाळ करीत असल्याने फिर्यादीला संशय आला व त्यांना नंतर आली फसवणूक झाल्याचे समजले.