कर्ज फेड न करता फसवणूक; एकाचा जामीन फेटाळला

पुणे – सदनिका खरेदीसाठी घेतलेले कर्ज, त्यावरील व्याज मिळून 28 लाख 20 हजार रुपयांची परतफेड न करता बॅंक ऑफ महाराष्ट्रची फसवणूक केल्याप्रकरणात एकाचा जामीन अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. के. मणेर यांनी फेटाळला.

समीर सुभाष रामगुडे (वय 41, रा. शुक्रवार पेठ) असे जामीन फेटाळलेल्याचे नाव आहे. बांधकाम व्यावसायिकासह दोघांवर या प्रकरणात गुन्हा दाखल आहे. बॅंकेच्या अधिकारी जान्हवी जोगळेकर यांनी याबाबत विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. मार्च 2016 ते 23 जानेवारी 2019 या कालावधीत बॅंकेच्या नारायण पेठ शाखेत ही घटना घडली. बॅंकेचे घेतलेले कर्ज 22 लाख 94 हजार 740 रुपये आणि त्यावरील व्याज 5 लाख 25 हजार 392 रुपये भरले नाहीत. कर्ज घेतलेली सदनिका परस्पर दुसऱ्याला विकल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणात पोलिसांनी रामगुडे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील प्रमोद बोंबटकर यांनी विरोध केला. तो या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आहे. सुरुवातीपासून त्याचा हेतू बॅंकेला फसविण्याचा असल्याचा दिसून येत आहे. जामीन मिळाल्यास तो पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. यासाठी त्याचा जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद ऍड. बोंबटकर यांनी केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.