चिंबळी – करंजविहिरे (ता. खेड) प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 34 गावांमध्ये 12 उपकेंद्रांमध्ये आतापर्यंत तीनवेळा सर्व्हे करण्यात आला असून चौथ्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. खराबवाडी, नाणेकरवाडी, मेदनकरवाडी, कडाचीवाडी, कुरुळी, मोई, निघोजे, चिंबळी, मंहाळुगे आदी गावे या आरोग्य केंद्रांतर्गत येतात. या गावांमध्ये साधरणात: 90 हजार लोकसंख्या असून त्यांचा तीनवेळा सर्व्हे करण्यात आला आहे.
सर्व्हेमध्ये 60 वर्षांवरील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे. तसेच त्यांना काळजी घेण्यास सांगितले जात आहे. तसेच मधुमेह, हृदयविकार व इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना करोना आजाराविषयी माहिती देऊन स्वतःची काळजी घेण्यास सांगितले. सध्या कोणाला सर्दी, खोकला, ताप व घसादुखी यासारखी लक्षणे आहे का विचारले जात आहे. तर ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून त्यांच्या कुटुंबाची नाव नोंदणी करण्यात येत असल्याचे करजंविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी जयश्री महाजन यांनी सांगितले.