सराईत गुन्हेगारांना विक्रीसाठी आणलेली चार पिस्तुले हस्तगत

गुन्हे शाखा युनिट तीनची कामगिरी

पिंपरी – सराईत गुन्हेगारांना विक्री करण्यासाठी आणलेली चार पिस्तुले आणि 15 काडतूसे पोलिसांनी हस्तगत केली. गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने ही कामगिरी केली.

सिध्दार्थ ऊर्फ रौनक रिपुमन शर्मा (वय 22, रा. कॉलनी नं. सात, लक्ष्मीनगर साई मंदीरजवळ, दिघी. मूळगाव बिहार) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेतील पोलीस कर्मचारी त्रिनयन बाळसराफ यांना आरोपीबाबत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून मॅक्‍झीन चौक, दिघी येथून आरोपी शर्मा याला ताब्यात घेतले. त्याची जागीच अंगझडती घेतली असता त्याचे जवळील सॅकमध्ये देशी बनावटीची दोन पिस्तुले व देशी बनावटीचे दोन कटटे तसेच 15 जिवंत काडतुसे मिळुन आली. त्याला विश्‍वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने हा शस्त्रसाठा सराईत गुन्हेगार बाबा पांडे व सॅंन्डी गुप्ता (दोघेही रा. भोसरी) यांच्या सांगण्यावरून बिहार येथून आणला होता.

पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधिर हिरेमठ, सहायक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भानुदास जाधव, सहायक निरीक्षक सतिश कांबळे, हवालदार राहुल खारगे, विठ्ठल सानप, गंगाधर चव्हाण, हजरत पठाण, सचिन मोरे, जमिर तांबोळी, योगेश आढारी, नाथा केकाण, अरुण नरळे, योगेश्वर कोळेकर, त्रिनयन बाळसराफ, महेश भालचिम, राजकुमार हनमंते व सागर जैनक यांचे पथकाने ही कामगिरी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.