ओतूरला कपर्दिकेश्‍वर मंदिरात तांदळाच्या चार पिंडी

ओतूर  – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र ओतूर (ता. जुन्नर) येथे चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त श्री कपर्दिकेश्‍वर मंदिरातील शिवलिंगावर तांदळाच्या चार पिंडी झाल्या असल्याची माहिती श्री कपर्दिकेश्‍वर देवधर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, सचिव वसंत पानसरे यांनी दिली.

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर यात्रा आणि गर्दीस निर्बंध असल्याने यात्रेकरू व भाविकांची गर्दी होऊ नये, याकरिता रात्री उशिरापर्यंत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त कपर्दिकेश्‍वर मंदिराजवळील आखाड्यात महाराष्ट्रातील नामवंत मल्लांची हजेरी असते. त्यांच्या कुस्त्या पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांची गर्दी ओसंडून वाहून अगदी आखाड्यात मेळा भरलेला असतो; मात्र याही वर्षी येथे शुकशुकाट होता.

पहाटे साडेपाच वाजता अनिल तांबे, ओतूर ग्रामपंचायत सरपंच गीता पानसरे तसेच प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री कपर्दिकेश्‍वराला महाभिषेक करण्यात आला व महाआरती झाली. मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त ‘राम कृष्ण हरी’ नामाची दिंडी काढण्यात आली. भाविक भक्तांनी येथे गर्दी करू नये म्हणून सहायक पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.