मुंबई – मुंबईत सध्या सहा जंबो कोविड सेंटर्स कार्यरत असून त्यात आणखी चार नवीन जंबो कोविड सेंटर्सची भर पडणार आहे. मे महिन्याच्या मध्यापर्यंत ही केंद्रे उभारण्याचा प्रयत्न केला जाईल अशी माहिती मुंबईचे अतिरीक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.
कांजुरमार्ग, मालाड, सायन आणि महालक्ष्मी येथे ही केंद्रे उभारली जाणार आहेत. यातील प्रत्येक सेंटर मध्ये प्रत्येकी दोन हजार बेड्स आणि दोनशे ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करून दिले जाणार आहेत. करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची ही तयारी आहे असेही जयस्वाल यांनी सूचित केले. मुंबईत सध्या जी व्यवस्था आहे तेथे एकूण आठ हजार बेड्स आणि पाचशे आयसीयु बेड्सची व्यवस्था उपलब्ध आहे. बीकेसी येथे जे जंबो सेंटर आहे त्याची क्षमताही वाढवण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.