Maharashtra Lockdowon | 14 तारखेनंतर लाॅकडाऊनची शक्यता; टास्क फोर्सच्या बैठकीनंतर स्पष्ट संकेत

मुंबई – राज्यात करोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी किमान 15 दिवसांचा लॉकडाऊन आवश्‍यक असल्याचे मत रविवारी टास्क फोर्सच्या बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. दरम्यान सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता.14) मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यानंतर लाॅकडाऊनबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

राज्यात करोनाबाधितांची संख्या सर्वत्र वेगाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर विलक्षण ताण आला आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्यात लॉकडाऊन लागू करण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होऊ लागले. या परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत शनिवारी घेतला. त्याबाबतचा निर्णय ते रविवारी जाहीर करतील, अशी अटकळ वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रात बांधली जात होती.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी निमंत्रित केलेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉक डाऊनच्या पर्यायावर विचार करण्यात आला. सुमारे दोन तास झालेल्या चर्चेनंतर लॉकडाऊन करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांनी सांगिते. सर्व वैद्यकीयब तज्ज्ञांनी दुसऱ्या लाटेत करोना प्रसाराचा वेग आणि वैद्यकीय सुविधांची आहे तीच स्थिती याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

लॉकडाऊन हा साथ रोखण्याचा उपाय नसला तरी त्यामुळे प्रसाराचा वेग कमी होऊ शकतो मधील काळात आपण वैद्यकीय सुविधा उभ्या करू शकतो. त्यामुळे लॉकडाऊन आवश्‍यक असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

मुख्यमंत्री सकारात्मक
दरम्यान सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता राज्यात लॉकडाऊनची आवश्‍यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांचे मत झाले आहे. मात्र, गेल्या वेळेला केंद्र सरकारने अचानक लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे नागरिकांचे आतोनात हाल झाले. विशेषत: व्यापारी आणि उत्पादक वर्गाचे हाल मोठ्या प्रमाणात झाले. या पार्श्‍वभूमीवर हे नुकसान कसे टाळावे याचा विचार मुख्यत: उध्दव ठाकरे यांच्यासमोर आहे.

गेल्या वेळेला लॉकडाऊन जाहीर केले, त्यावेळेस काही समाज कंटकांनी परप्रांतीयांसाठी रेल्वे सुरू केल्याच्या अफवा पसरवल्या. त्यामुळे कुर्ला आणि वांद्रा रेल्वे स्थानक परिसरांत न भुतो न भविष्यती अशा स्वरूपाचा गोंधळ निर्माण झाला. अशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून काळजी घेण्याच्या सूचना गृहखात्याच्या वरीष्ठांना देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सरकार ठाम
सामान्य नागरिक जगला पाहिजे, ही या सरकारची भूमिका आहे. त्याला जगवण्यासाठी लॉकडाऊन आवश्‍यक असेल तर ते केले पाहिजे अशी भूमिका आघाडी सरकारमधील सर्वच पक्षांनी घेतली. त्याच वेळी याबाबत नागरिकांची मानसिक तयारी करण्यासाठी वेळ देण्यात यावा अशीही भूमिका काही जणांनी मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.