49 गावांतील विकासकामे लागणार मार्गी
रेडा-सन 2019-20 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधीने सुचवलेल्या ग्रामीण भागातील गावांतंर्गत मूलभूत सुविधा पुरवणे या योजनेअंतर्गत म्हणजे शासनाच्या पंचवीस पंधरा योजनेमधून इंदापूर तालुक्यातील गावांसाठी चार कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम, जलसंधारण, दुग्धविकास व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
इंदापूर तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून शासनाकडे अनेक गावांतील उपेक्षित कामे मार्गी लागण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते. यामध्ये एकूण पुणे जिल्ह्यात 2174 लाख निधीच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ज्या कामांवर शासनाच्या माध्यमातून निधी मंजूर झाला आहे, तीच कामे या निधीतून पूर्ण केली जाणार आहेत. ती मंजूर करण्यात आलेल्या निधीची कामे 31 मार्च 2021 पर्यंत पूर्ण करून घेणे गरजेचे आहे, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
या मंजूर कामांमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, संरक्षण भिंत बांधणे, व्यायाम शाळेचे बांधकाम करणे, नवीन रस्ता तयार करणे, सामाजिक सभागृह बांधणे, बंदिस्त गटार बांधणे, पेव्हिंग ब्लॉक बसवणे अशी कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. यामध्ये इंदापूर तालुक्यातील लासुर्णे, वरकुटे खुर्द, निमगाव केतकी, रेडा, काटी, हागारेवाडी, शहा, शेटफळगडे, शेळगाव, अकोले, न्हावी, काझड, वालचंदनगर, वडापुरी, भिगवण, चिखली, निमसाखर, आजोती, गलांडवाडी, बेलवाडी, भरणेवाडी, कळस, कुरवली, सणसर, चाकाटी, बिजवडी, बंडगरवस्ती, पिठेवाडी, म्हसोबाचीवाडी, पिटकेश्वर, झगडेवाडी या गावातील विकास कामांसाठी निधी मंजूर झाला आहे, अशीही माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.