ऑकलंड – न्यूझीलंडचे माजी कसोटी क्रिकेटपटू जॉन रिड यांचे बुधवारी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते. रिड हे न्यूझीलंडचे सर्वात वयस्कर क्रिकेटपटू होते. 1950-60 च्या दशकात त्यांनी आक्रमक फलंदाज व अष्टपैलू खेळाडू असा लौकीक मिळवला होता.
34 कसोटीत त्यांनी न्यूझीलंडचे नेतृत्वही केले होते. त्यांनी 246 प्रथम दर्जाच्या सामन्यांतून 16 हजार 128 धावा केल्या होत्या. त्यात 39 शतके फटकावली होती. तर, अष्टपैलुत्व सिद्ध करताना 466 बळीही घेतले होते. त्यांनी 58 कसोटीत 3 हजार 428 धावा केल्या. त्यात 6 शतके होती. गोलंदाजीतही चमकदार कामगिरी करताना 86 बळीही घेतले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 142 धावांची खेळी ही त्यांची कसोटीतील सर्वोच्च खेळी होती. 1949 साली त्यांनी कसोटी पदार्पण केले होते.