बीजिंग – चीनच्या दबावामुळे पॅसिफिक महासागरातील नाउरु या लहानशा बेटाच्या देशाने तैवानशी असलेले आपले सर्व राजनैतिक संबंध तोडून टाकले आहेत. तैवानशी असलेले सर्व संबंध तोडावे यासाठी चीनने नाउरुबरोबरचे संबंध तोडले होते. नाउरुने गेल्या आठवड्यात तैवानबरोबरचे सर्व संबंध तोडून टाकले आणि आपल्या परराष्ट्र धोरणानुसार चीनच्या भूमिकेला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर आज चीनने नाउरुबरोबरचे सर्व संबंध पुन्हा सुरळीत केले.
तैवानमध्ये झालेल्या अध्यक्षीय निवडणुकांमध्ये नवीन अध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडीवरून नाउरुने तैवानचे अभिनंदन केले होते. पण दोनच दिवसांनी १५ जानेवारीला चीनच्या दबावामुळे नाउरुने तैवानबरोबरचे संबंध तोडून टाकले. नाउरु हा छोटा देश व्यापारी कारणासाठी चीनवर अवलंबून असल्यामुळे आर्थिक कोंडी करण्याची धमकी देऊन चीनने नाउरुला आपल्या मताशी सहमत होण्स भाग पाडले आहे.
यामुळे स्वतंत्र तैवानला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाठिंबा देणारे अवघे १२ देश उरले आहेत. अमेरिका, जपान आणि अन्य काही महत्वाच्या देशांचा तैवानला पाठिंबा आहे. तैवान हा चीनच्या मुख्य भूमीचा एक भाग असल्याचा दावा चीनकडून सातत्याने केला जातो आहे. बळाच्या जोरावर तैवानचे एकिकरण केले जाईल, असा इशाराही चीनकडून दिला जातो आहे. त्यासाठी तैवानच्या सीमेवर आणि सागरी हद्दीजवळ चीनची विमाने आणि युद्धनौकांच्या घिरट्या नेहमी सुरू असतात.