भोर – भोर-वेल्हे तालुक्याचे माजी आमदार संपतराव जेधे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज पहाटे ५ वाजून ४५ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
माजी आमदार संपतराव जेधे यांचा अल्पपरिचय
भोरचे पहिले आमदार स्व. कॉम्रेड जयसिंग माळी नंतर स्व. आमदार काका भेलके त्यानंतर अनंतराव थोपटे आमदार म्हणून भोर-वेल्ह्याचा कारभार पाहात होते. त्यावेळी तरूण सहकार्यांच्या मदतीने संपतराव अण्णा यांनी आंबवडे गावच्या सरपंचपदी विराजमान झाले होते.
यानंतर भोरची पंचायत समितीची निवडणूक जिंकत अण्णा भोरचे सभापती झाले. त्यावेळी 1972 साली अनंतराव थोपटे भोरचे आमदार होते. 1978 साली विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार आमदार अनंतराव थोपटे यांचा अपक्ष उभे राहत संपतराव जेधे यांनी पराभव केला. आणि जेधे भोर-वेल्ह्याचे आमदार म्हणून निवडून आले.
संपतराव जेधे यांनी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष, पंढरपूर ट्रस्टचे 10 वर्ष सदस्य, स्वामी विवेकानंद संस्थेचे कार्याध्यक्ष, दुध संघ, शिवथरघळ ट्रस्टचे अध्यक्ष अन्य महत्वाच्या पदांचा कार्यभार पहिला आहे.