नगर -नगर शहरात करोनाचा दिवसेंदिवस प्रादुर्भाव वाढत असून शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल राठोड यांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्यांना खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या कुटुंबातील चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत.
राठोड यांना फ्लूसदृश लक्षणे जाणवत असल्याने त्यांनी रविवारी स्वॅब दिले. त्यांचा अहवाल काल रात्री पॉझिटिव्ह आला. तसेच त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांचेही स्वॅब घेण्यात आले असून, त्यांची पत्नी, मुलगा, सून हेही पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. रात्रीच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शहराबरोबरच शेजारील गावांमध्ये रुग्ण सापडू लागले आहेत. शहरातील माल खरेदीसाठी लोक येत असून, त्यातून त्यांना बाधा होताना दिसत आहे. नगर तालुक्यातील अनेक गावे सध्या बंद आहे. सध्याही शहरातील अनेक भाग करोनामुळे सील करण्यात आला आहे. शहराजवळील उपनगरांमध्ये करोनाचे रुग्ण आढळत असून, रोज आकडेवारी वाढत आहे. सारसनगर, केडगाव आदी भागातील रुग्ण वाढीची संख्या जास्त आहे.
तोफखाना, नालेगाव, बालिकाश्रम रोडवरील रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन वेळोवेळी प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या चितळेरोड परिसरात मागील काही दिवस पूर्णपणे बंद होते. आता मात्र, गर्दीने हा रस्ता भरला आहे. याच रस्त्यावर राठोड यांचे शिवसेनेचे कार्यालय आहे. भाजीबाजार बंद केला असला, तरी इतर दुकाने या परिसरात सुरू आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागाला पुन्हा सील करण्याची गरज असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त होत आहे.