बंगळुरु – देशावर करोनाचे संकट असताना देशभरात अनेकांनी आपापले विवाह सोहळे पुढे ढकलण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांचा पुत्र असलेला अभिनेता निखिल थाटामाटात विवाहबंधनात अडकला. लग्नाच्या फोटोमध्येच सोशल डिस्टंन्सिगचे तीन-तेरा वाजल्याचेही चित्र दिसत आहे.
शुक्रवार 17 एप्रिलच्या मुहूर्तावर निखिलचे लग्न रेवतीसोबत करण्याचे आधीपासूनच ठरले होते. रेवती ही कर्नाटकचे माजी गृहनिर्माणमंत्री एम. कृष्णाप्पा यांची नात आहे. मात्र लग्नावर करोनाचे सावट असल्याने दोन्ही कुटुंबीय चिंतेत होते.
आम्हाला धुमधडाक्यात लग्न करायचे होते, तुम्हा सर्वांना आमंत्रण द्यायचे होते. परंतु करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे आम्हाला ठरलेल्या दिवशीच छोटेखानी विवाह सोहळा आखणे भाग आहे, असे म्हणत कुमारस्वामी यांनी पाहुण्यांची माफी मागितली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना आणि हितचिंतकांना विवाहस्थळी भेट न देण्याचे आवाहन केले. घरुनच वधू-वरांना आशीर्वाद देण्याचे आवाहन कुमारस्वामी यांनी केले. बंगळुरु हे करोनाच्या रेड झोनमध्ये येत असल्यामुळे रामनगर या ग्रीन झोन शहरातल्या फार्म हाऊसवर लग्न पार पडले. 12-13 डॉक्टरांसोबत बोलून लग्नसोहळा आयोजित केल्याचे कुमारस्वामी म्हणाले आहेत.
25 मार्च रोजी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली, तेव्हा 14 एप्रिलला ते संपण्याच्या आशेने कुटुंबांनी बंगळुरुत कृष्णाप्पा यांच्या घरी लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु लॉकडाऊन वाढवण्यात आल्याने आणि बंगळुरु हॉटस्पॉट म्हणून घोषित झाल्याने त्यांना पुन्हा विवाहस्थळ बदलावे लागले, अशी माहिती जेडीयू (एस) प्रवक्ते सदानंद यांनी दिली. दरम्यान, मी रामनगरच्या उपायुक्तांकडे अहवाल मागवला आहे. पोलीस अधीक्षकांशीही बोलत आहे. आम्हाला कारवाई करावीच लागेल, अन्यथा ही यंत्रणेची चेष्टा ठरेल, अशी प्रतिक्रिया कर्नाटकचे उपमुख्यमंत्री सी. एन. अश्वनाथनारायण यांनी दिली आहे.