पुणे – अजित पवारांच्या बंडामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दोन गट पडले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या गटांत कोण पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक तसेच आमदार आहेत, याचा अंदाज घेण्यासाठी शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसने मंगळवारी बोलविलेल्या बैठकीत पक्षाच्या माजी नगरसेवकांसह, दोन्ही आमदारांनी दांडी मारली. तर बोटावर मोजण्याइतकेच माजी नगरसेवक दिसून आले.
दरम्यान, “शहरातील 42 पैकी 23 माजी नगरसेवक आमच्यासोबत आहेत,’ असा दावा शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यामागे उभे राहण्याचा ठरावही एकमताने मंजूर केला आहे. यावेळी राज्यसभा खासदार ऍड. वंदना चव्हाण, माजी आमदार ऍड. जयदेव गायकवाड, जगन्नाथ शेवाळे, कमल ढोले पाटील, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर शांतिलाल सुरतवाला यांच्यासह मोजके माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदारही आले नाहीत
बैठकीला राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांना निमंत्रण दिले होते. मात्र, हडपसरचे आमदार चेतन तुपे आणि वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार सुनील टिंगरे अनुपस्थित होते. याबाबत विचारले असता “बैठकीचे निरोप सर्व माजी नगरसेवक आजी-माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. काही कारणांमुळे दोन्ही आमदार आले नाहीत. असेच त्यांचा कोणता निरोपही आलेला नाही,’ असे प्रशांत जगताप म्हणाले.
शहर कार्यालयावर आमचा ताबा : जगताप
अजित पवार गटाने पक्ष कार्यालयाचा ताबा घेतल्यास काय? याबाबत विचारले असता, प्रशांत जगताप म्हणाले “आम्ही शरद पवार यांच्यासोबतच आहोत. समोरच्या गटाकडून वेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होतील. त्यांचे वेगळे कार्यालय होईल. ते सध्याच्या शहर कार्यालयाचा ताबा घेऊ शकत नाहीत. कारण, या कार्यालयाचा करारनामा प्रशांत सुदाम जगताप यांच्या नावाने आहे. ताबा घेण्याचा कोणी प्रयत्न केला, तर त्यांच्यावर पोलिसांत तक्रार दिली जाईल.’