पणजी – गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत यांची पक्षाच्या कायम स्वरूपी निमंत्रक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत कामत यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कॉंग्रेस आमदारांना भाजपमध्ये नेण्यासाठी दबाव आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
दिगंबर कामत यांची आमदारकी रद्द करावी अशी मागणी करणारे पत्र प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी विधानसभा सभापती यांना यापूर्वीच दिले आहे.
पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षाने आमदार मायकल लोबो यांची गेल्या रविवारी विरोधी पक्ष नेतेपदावरून हकालपट्टी केली होती. गोव्यातील कॉंग्रेसमध्ये अंतर्गत कलह उफाळून आला होता. मात्र पक्षांतरासाठी आवश्यक आमदार संख्या समीकरण न जुळल्याने बंड फसले. राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष फुटीच्या भीतीने सावध कॉंग्रेसने आपले 5 आमदार गोवा बाहेर हलवले आहेत.