मुंबई – राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये मोठी फूट पडली. यानंतर विधानसभेचे विरोधी पक्ष नेतेपद रिकामे झाले होते. यानंतर कॉंग्रेसने माजी मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते. त्यानंतर गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी औपचारिरक निवड केल्याची घोषणा केली.
वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांचे आभार मानले आणि वडेट्टीवार यांचे कौतुक करत नाना पटोले आणि उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. शिंदे सभागृहात म्हणाले, “विजय वडेट्टीवार हे विदर्भातील नेते आहेत. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील विदर्भातील नेते आहेत. विदर्भात पाण्याचा वेगळा गुण असतो.
त्यामुळे आजच्या इतिहासात महाराष्ट्राला चार विदर्भातले मुख्यमंत्री मिळाले. विदर्भाच्या सूनेला या देशाचे राष्ट्रपती पद देखील मिळाले. वडेट्टीवार हे मूळचे शिवसैनिक आहेत. परंतु त्यांच्यावर थोडा अन्याय झाला. अधिवेशनाच्या सुरूवातीलाच नाना पटोले आणि बाळासाहेब थोरातांनी त्यांची निवड करायला पाहिजे होती. असो पदाला वडेट्टीवार नक्कीच न्याय देतील.
“वडेट्टीवार यांचा स्वभाव आक्रमक आणि बेधडक आहे. राजकीय जीवनात त्यांनी सुरूवातीच्या प्रवासात विदर्भात शिवसेना वाढवण्याचे काम केले. काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी बाळासाहेबांचे संस्कार त्यांच्यावर झालेले दिसत नाही,’ असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.