कोल्लम/ तिरुवनंतपुरम – केरळच्या कोल्लम जिल्ह्यामध्ये विदेशी बनावटीची काडतुसे सापडल्याच्या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली असून केरळ सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थांकडे आणि अन्य राज्यांच्या तपास संस्थांकडे सोपवला आहे. या प्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाच्या महासंचालकांच्या देखरेखीखाली होणार आहे. ही काडतुसे पाकिस्तान बनावटीची असल्याचा संशय असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे.
केंद्रीय एजन्सींना या काडतुसांबद्दल कळवण्यात आले आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचीही मदत घेतली जाणार आहे, असे पोलीस महासंचालक लोकनाथ बेहेरा यांनी रविवारी सांगितले.
शनिवारी तामिळनाडूच्या सीमेपासून सुमारे 60 किलोमीटर अंतरावरील कुलथुपुझा येथे ही 14 जिवंत काडतुसे आढळून आली होती. त्यानंतर रविवारी एर्नाकुलम येथून सैनिकी इंटेलिजेंसच्या दोन सदस्यांचे पथक तपासासाठी या गावी पोहोचले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या काडतुसांवर पाकिस्तान ऑर्डनन्स फॅक्टरी (पीओएफ) चे चिन्ह असल्याने ही काडतुसे पाकिस्तानातील असल्याची शंका आहे. एटीएसचे पोलीस उपमहानिरीक्षक अनूप कुरुविला कुलथूपुझा हे या या काडतुसांबाबतच्या तपासावर नजर ठेवणार असल्याचे बेहेरा यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या तपासामध्ये कोणत्या राज्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे, हे पोलिसांनी स्पष्ट केलेले नाही. मात्र तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमा केरळला चिकटलेल्या असल्याने त्या राज्यांमध्येही तपास होण्याची शक्यता आहे.