सातारा – कोरेगाव पंचायत समिती मुख्यालयातील निलंबित उपशिक्षक भगवान बाबासाहेब लोहार व भेकवलीच्या (ता. महाबळेश्वर) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक चंद्रकांत पांडुरंग राजे यांनी शाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तणूक केल्याच्या तक्रारीवरुन दोघांनाही जिल्हा परिषद सेवेतून सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी दिली. या कारवाईने प्राथमिक शिक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, भगवान लोहार तळी (बांबवडे ता. पाटण) येथे शाळेत कार्यरत असताना विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले होते. याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या घटनेने जिल्हा परिषदेची बदनामी झाली होती. लोहार यांनी पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला होता. या दोन्ही प्रकरणात लोहार यांना निलंबित करुन त्यांची खातेनिहाय व विभागीय चौकशी करण्यात आली.
या चौकशीत त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिध्द होत असल्याने लोहार यांना सक्तीने सेवानिवृत्त करण्याची शिक्षा संजय भागवत यांनी एका आदेशाद्वारे दिली. उपशिक्षक चंद्रकांत पांडुरंग राजे दुर्गळवाडी (ता. कोरेगाव) येथे असताना त्यांनी विद्यार्थिनींशी गैरवर्तन केले होते. त्यानंतर ग्रामस्थांनी 30 नोव्हेंबर 2016 रोजी शाळेला टाळे ठोकले होते.
चंद्रकांत राजे याच्या या गैरवर्तणुकीमुळे जिल्हा परिषदेची बदनामी झाली होती. राजे यांना निलंबित करुन त्यांची खातेनिहाय व विभागीय चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांच्यावर ठेवण्यात आलेले आरोप सिध्द झाले. विभागीय चौकशीचा अहवाल तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी राजे यांना सक्तीने सेवानिवृत्तीची शिक्षा दिली.
समाजामध्ये शिक्षकांचे स्थान माता- पित्यापेक्षा श्रेष्ठ असते. त्यामुळे त्यांनी प्रतिमा जपणे आवश्यक आहे. समाजाच्या विश्वासाला तडा देणारे वर्तन या शिक्षकांकडून झाले. या शिक्षकांच्या वर्तनाबाबत त्यांना बडतर्फ करणे उचित झाले असते. मात्र, संबंधित शिक्षकांवर त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी असल्याने त्यांना सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षा दिली आहे. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही.
संजय भागवत, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा.