रेडा -इंदापूर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींकडे दुग्धविकास खात्याचे मंत्रिपद आहे. मात्र, त्यांच्याकडून तालुक्यातील दूधदरवाढीसाठी सहकार्य करणे सोडाच, उलट दूधगंगा सहकारी दूध संघ हा बंद नव्हे तर अवसायानात काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचा मी निषेध करतो. सरकारला दूध दरवाढीचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असा इशारा भाजपचे नेते, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला.
इंदापूर येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजप व महायुतीच्या वतीने दूधदर वाढीचे तहसील कार्यालयाच्या गेटसमोर आंदोलन करण्यात आले.यावेळी दूध दरवाढीच्या मागणीचे निवेदन तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी स्वीकारले.
राज्यातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. अडचणीतील दूध उत्पादकांना मदत करणे, ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारला दूधास प्रतिलिटरला 30 रुपये दर देण्यास भाग पाडू, असा इशारा त्यांनी दिला.
जर शासनाने दरवाढ केली नाही तर आंदोलन तीव्र करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाजप न्याय मिळवून देईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी ऍड. कृष्णाजी यादव, मंगेश पाटील, विलासराव वाघमोडे, शिवाजी मखरे, शकील सय्यद, हर्षवर्धन कांबळे यांनी मनोगते व्यक्त केली.
गोमातेचे पूजन
पोलीस स्टेशन समोर आंदोलनात सहभागी झालेल्या गोमातेचे पूजन भाजपचे नेते पाटील यांनी केले. त्यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्यासह कार्यकर्ते हे सरकारविरोधात घोषणा देत बाबा चौकमार्गे तहसीलदार कार्यालय गेटसमोर आले. मुक्या सरकारचा मुक्या जनावरांकडून जाहीर निषेध, मला वाचवा, ही वाक्य रचना असलेली गाईच्या अंगावरील झूल सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.