सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात श्री क्षेत्र कुणकेश्वर आहे. “कोकण काशी’ असे याचे महत्त्व आहे. समुद्रकिनाऱ्यावर उंच चबुतऱ्यावर हे द्रविडीयन पद्धतीचे भव्य व सुंदर मंदिर आहे. साक्षात सिंधुसागर कुणकेश्वरला असंख्य नीलवर्णी लाटांनी पदस्पर्श करतो. सागरी लाटांपासून संरक्षणासाठी पश्चिमेला दगडी तटबंदी आहे. निळ्या सागरी किनाऱ्यावर बदामी रंगातील मंदिराची नीलगगनाला भिडणारी उंच शिखरे लक्ष वेधतात. मंदिराच्या परिसरातील जोगेश्वरी देवालयासमोर दोन उंच दीपमाळा व तुळशी वृंदावन आहे. चबुतऱ्यावर भव्य नंदी आहे. त्यामागे श्री देवमंडलिक हे शिव मंदिर, नारायण मंदिर व गणेश मंदिर आहे. मध्यभागी श्रीकुणकेश्वर मंदिर आहे. सुंदर स्तंभांवर तोललेल्या सभा मंडपात वर्तुळाकृती कासव आहे. छतावर उत्कृष्ट कलाकुसर आहे. प्रवेशद्वारांवर नक्षीदार स्तंभांवर दशावतार कोरलेले आहेत. अश्वमुख व नागराजाचे शिल्पपट आहेत. द्वारपट्टीकेवर शेषशायी विष्णूचे शिल्प आहे. गर्भागारातील काळ्या पाषाणातील शाळुंकेचे दर्शन घेताच मन प्रसन्न होते. मंदिरालगतच्या सुंदर समुद्र किनाऱ्यावरील शिवपिंडी ओहोटीच्या वेळेस दृष्टीस पडतात. हे क्षेत्र बहात्तर ग्रामदैवतांचा अधिपती आहे. महाशिवरात्रीला सर्व ग्रामदेवता शिखरकाठी नाचवत इथे येतात. अशा दक्षिणकाशीचे दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवे. – माधुरी शिवाजी विधाटे