पुणे – शहरात सलग तिसऱ्या दिवशी करोना बाधितांची संख्या वाढलेली आहे. दिवसभरात नव्याने 372 बाधित सापडले असून, एक महिन्यानंतर पहिल्यांदाच करोनामुक्त व्यक्तींपेक्षा नवीन बाधितांची संख्या अधिक असल्याची नोंद झाली आहे. ही वाढती संख्या करोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरवात तर नाही ना? ही लाट वेळीच थोपवायची असेल तर नागरिकांनी गर्दी टाळावी. प्रशासनाकडून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यंत आवश्यक आहे.
बाधितांच्या वाढत्या संख्येबरोबर मृत्युच्या संख्येतही वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात शहरात 10 जणांचा करोनामुळे मृत्यु झाला आहे. सक्रीय बाधितांची संख्या 4 हजार 628 झाली असून, गेल्या 24 तासात जवळपास तीनशेने वाढ झाली आहे. मागील आठवड्यात दीड ते दोन हजारापर्यंत होणारी दररोजची नमुने तपासणी संख्या आता तब्बल चार हजारांवर पोहचली आहे.
ऑक्सीजनवरील बाधितांच्या संख्येने पुन्हा एक हजाराचा टप्पा ओलांडला असून, व्हेंटीलेटरवरील बाधितांची संख्याही किंचीत वाढली आहे. त्यामुळे दिवाळी सणामध्ये झालेली गर्दी आणि करोनाचा धोका माहित असूनही करोना संरक्षकाच्या दृष्टीने असलेले नियम धुडकावणे आता जीवावर बेतते की काय अशी भिती निर्माण झाली आहे. दिवसभरात 209 बाधित करोनामुक्त झाले आहेत.